पाऊस

      आज दिवसभर पावसाने चांगलाच जोर धरला होता. सकाळपासून संततधार चालू आहे. माझ्या आवडत्या खिडकीतून मी पावसाच्या टेरेसवर पडणाऱ्या धारा न्याहळत होते. साठलेल्या पाण्यात टपोरे थेंब पडून वर्तुळे तयार होत होती , त्या वलंयांना निरखत निरखत मन भूतकाळात कधी गेले ते कळलेच नाही. मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या आठवणींना हा पाऊस नेहमीच वाट देतो.

त्या दिवशीही असाच मुसळधार पाऊस लागला होता. जूनचा महिना होता तो. आमची नुकतीच  शाळा सुरु झाली होती. मी आणि माझी लहान बहीण शाळा सुटल्यावर बस स्टॉपवर बसची वाट पाहत उभे होतो. माझे वय वर्ष नऊ आणि बहिणीचे सात वर्षे. माझी लहान बहीण  म्हणजे एक स्वच्छंदी जीव. साठलेल्या पाण्यात उड्या मारून मारून तिने आधीच तिचा युनिफॉर्म ओला केला होता. एक-दोन-तीन करून तिच्या उड्या चालूच होत्या. बस  येण्याची वेळ निघून गेली होती , खूप वेळ वाट पाहून आता बस येणार नाही अशी माझी खात्री झाली होती. पावसाळ्यात बसेस कॅन्सल होणे हे खूप नॉर्मल असायचे तेव्हा . मी चालत घरी जाण्याचा निर्णय घेतला.  बहिणीला चार किलोमीटर पायी देणे हे खूप जिकरीचे काम होते. आणि ते मला आज करावे लागणार होते.  माझी नेहमीचीच युक्ती म्हणजे तिला गोष्टी सांगत सांगत डायव्हर्ट करायचे, म्हणजे किती चाललो याचा तिला गोष्टी ऐकण्याच्या नादात  पत्ताच लागत नसे.

शाळेपासून घराकडे जाण्याच्या रस्त्यात एक मोठा ओढा लागत असे. या ओढ्यावरचा पूल अतिशय कमी उंचीचा असल्याने जरा जास्त पाऊस झाला की ओढ्याचे पाणी पुलावरून वाहू लागत असे. आम्ही चालत चालत ओढ्यापर्यंत पोहोचतच होतो , तेव्हा पाच ते सहा झाडूवाल्या मावश्यंॎचा एक ग्रुप आम्हाला येताना दिसला. त्याही बहुदा कामानंतर पाईपाई घरी चालत होत्या. "काय गं पोरींनो बस नाही आली वाटते आज?"  त्यातल्या एका मावशीने विचारले. "खूप वाट पाहिली पण आलीच नाही म्हणून आम्ही आता चालत निघालो घरी" असे मी सांगितले.

 माझ्या लहान वयामुळे की काय कोण जाणे पण मला ओढ्याच्या पाण्याच्या वेगाचा अंदाज आला नसावा. ओढ्याच्या पुलावरून पाणी अतिशय वेगाने वाहत होते . या पुलाला दोन्ही बाजूने कठडा देखील नव्हता. पण मला हा धोका अजिबात लक्षात आला नाही. मी आणि माझ्या बहिणीने ओढ्याच्या पाण्यात एक-दोन-तीन असे करून डबके समजून उडी मारली.  पाहता पाहता त्या वेगवान पाण्याने आम्हाला ढकलायला सुरूवात केली . आम्ही आकाराने इतक्या लहान होतो की काही सेकंदात पुलाच्या दुसऱ्या कडेला ढकलल्या गेलो. भीतीने डोळ्यासमोर काळाकुट्ट अंधार पसरला. आई आई अशा जोराने हाका मारत मी लहान बहिणीचा हात घट्ट पकडला. आता सर्व संपले आणि ओढ्यात आपण बुडणार याची खात्री झाली.  तेवढ्यात कोणीतरी आम्हाला उचलून घेतले. पण डोळ्यात आलेल्या पाण्याने पटकन काहीही दिसलेही नाही. ओढा पार झाल्यावर झाडूवाल्या मावशींनी आम्हाला घट्ट उराशी धरले. "घाबरू नका ग पोरींनो ...आत्ता बघा त्या देवाने वाचवले  तुम्हाला..." नंतर घरापर्यंत सोबत करून त्या मावशींनी दोघींना घरी सोडले.  "पोरी खूप घाबरल्याआहेत असे सांगून सर्व वृत्तांत आईला सांगितला . अजूनही ती मावशींची मिठी आणि त्यांचा चेहरा मी विसरू शकत नाही.  मावशींच्या माणुसकीने जणू देवच आज धावून आला होता. 
या झाडूवाल्या मावशींशी आमचे एक वेगळेच नाते होते, आमच्या घरासमोरचा रस्ता झाडायला रोज एक कॉर्पोरेशनच्या झाडूवाल्या मावशी येत असत. मावशींना कॉलनीमधील कोणी विचारो अथवा न विचारो, माझी आई रोज पाणी हवे? का चहा हवा का? असे आवर्जून विचारणारच. मावशींनाही त्याची सवय झाली होती, त्यादेखील फक्त आईकडेच पाणी व चहा मागायच्या. आई नेहमी म्हणायची आपला परिसर मावशी स्वच्छ ठेवतात,आपण त्यांच्या कामाचा आदर केलाच पाहिजे. सर्व कष्टकरी लोकांविषयी आईला विशेष आदर व आपुलकी होती. अशाच एक मावशी आज आम्हाला देवरूपाने वाचवायला आल्या होत्या.

आजही आईचे संस्कार व कष्टकरी लोकांचा आदर करणे  मी विसरले नाही. आई नेहमीच लोकांना मदत करायची तिची ती पुण्याई त्यादिवशी  मावशींच्या रूपाने कामाला आली. 
 पाण्याच्या थेंबांनी सर्व आठवणी जागा केल्या.  प्रत्येक पावसाळ्यात मला ही आठवण आल्याशिवाय राहत नाही.

अनघा महाजन…. स्टुटगार्ट, जर्मनी

Comments

Popular posts from this blog

Istanbul Diary

Mother's Day special

Stuttgart Christmas market