फाशिंग
जर्मनीतील पश्चिम भागात नुकत्याच झालेल्या "फाशिंग" या सणाविषयी माहिती:
तुम्ही जर्मनीमध्ये काही महिने अथवा अधिक काळ वास्तव्य करुन गेला असाल तर येथील सांस्कृतिक सण आणि ते सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल तुमच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली असेल.
विशेषतः हिवाळ्याच्या सुट्टीच्या काळात येथे ख्रिसमस व फाशिंग हे दोन महत्त्वाचे सण असतात. सर्वात अलीकडे साजरा झालेला उत्सव "फाशिंग " हा आहे. फाशिंगला जर्मनीच्या पश्चिम भागात कार्निवल म्हणून देखील ओळखले जाते. हा कार्निवल 11 नोव्हेंबरला मध्यरात्री 11 वाजण्यास अकरा मिनिटे कमी असताना सुरू होतो असे म्हणतात. अनेक ख्रिश्चन पारंपारिक सणांपैकी हा एक सण आहे. तो नोव्हेंबर पासून पुढे तीन महिने चालतो व त्याची सर्वात मोठी मिरवणूक "रोज मंडे" म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ईस्टरच्या आधी बेचाळीस दिवस निघते.
फाशिंग आणि कार्निवल यांचा तंतोतंत संबंध नाही, परंतु ते साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये साम्य आहे. इतिहासाच्या पुस्तकांचा आढावा घेतांना या उत्सवाचे वर्णन असे करतात की हा उत्सव म्हणजे आपल्या शासकांबद्दल लोकांचा निषेध म्हणून दर्शविण्याची लोकांना मिळालेली संधी.. जेव्हा सामान्य नागरिक राजकीय व्यक्तींचे मुखवटे धारण करून आणि त्यांची भीती न बाळगता थट्टा करू शकत असत.
ख्रिस्ती परंपरेनुसार ईस्टरचे उपवास सुरू होण्यापूर्वी खाण्यापिण्याचा, आनंद घेण्याचा सण. तर काही लोकांसाठी वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करणारा सण. या सणाचे मूळ काय असावे हा विचार बाजूला ठेवला तर, या उत्सवात बहुतेक वेळा वेषभूषा करणे आणि शहरातून परेड करणे, तसेच राजकीय व्यक्तींची चेष्टा करणे समाविष्ट असते.
यावर्षी माझ्या "वाईबलींगन" या गावात, "फाशिंग" मीरवणूक पूर्वीपेक्षा अधिक रंगतदार झाली , असंख्य गटांनी व बँन्डसने विविध पोशाख घातले होते. कोणी चेटकीणीचे, तर कोणी भूतांचे तर कोणी हिंस्र श्वापदांचे पोशाख घातले होते. या मिरवणुकीत लाकडात कोरलेल्या मुखवट्यांचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. हे मुखवटे चेटकिणी,भुते ,सैतान तसेच श्वापदे यांचे असतात. प्रत्येक ग्रुप व बँड्स एक समान प्रकारचे मुखवटे व पोशाख घालून मनोरंजन करतात. हे असे भयानक मुखवटे घालण्यामागे काय कारण असावे, असे विचारल्यास सांगण्यात आले की, पूर्वी कडक हिवाळ्यात घरात बसून राहावे लागत असे, लोकांच्या मनात अज्ञानामुळे अनेक भीती निर्माण होत असत. त्या भीतींना पळवून लावण्यासाठी अशा प्रकारचे भयानक मुखवटे घालून मिरवणूक काढून मनोरंजक प्रकारे लोकांच्या मनातील भीती घालवत असावेत.
मिरवणुकीतील या चेटकिणी आधी प्रेक्षकांना घाबरवून व नंतर मिठाया वाटून हसवत होत्या. प्रेक्षकही फॅन्सी वेशभूषा करून चेहरे रंगवून आल्याने वातावरण सजीव व उत्साहवर्धक होते. एरव्ही तुलनेने शांत असलेले शहर आज लोकांनी ओसंडून वाहत होते. मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून परेड पहात होते आणि सहभागी असणाऱ्यांना उत्तेजन देत होते.
जर्मनीतील सर्वात मोठी कार्निवल परेड "कोलोन "या गावामध्ये निघते. या परेडमध्ये जर्मनीच्या अनेक भागांमधील प्रसिद्ध बँड्स भाग घेतात. सुमारे दहा हजारांहून अधिक लोक त्या परेडमध्ये असतात.
जगातील अनेक पर्यटक ही परेड बघण्यासाठी खास येतात. फॅन्सी ड्रेसेस, म्युझिक आणि पार्टी हे या परेडचे मुख्य आकर्षण असते.
जर्मनीच्या तुमच्या भेटीचा योग जर फेब्रुवारी महिन्यात आला तर हा रंगीबेरंगी आणि उत्साही कार्निवल पाहण्याचा विसरू नकात.
Comments
Post a Comment